रेखा कैथल
ब्यूरो चीफ
चंद्रपुर:- घुग्घुस शहरातील रेल्वे ब्रिजचे काम चालू असल्याने शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण होत असल्याने या वाहतूक समस्येबाबत १७ ऑगस्ट २०२२ रोजी प्रशासकीय अधिकारी व माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी पाहणी केली होती व पाहणीचा अहवाल सादर केला होता.
३१ ऑक्टोबरपर्यंत शहरातील जड वाहने वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाच्या नियमनासाठी शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच जनतेला त्रास होऊ नये त्यांची गैरसोय होऊ नये व अपघातासारखे अनुचित प्रकार घडून जिवित किंवा वित्तहानी होऊ नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जड वाहतूक बंद करण्यात आली होती.
घुग्घुस शहरात ट्रान्सपोर्ट व्यवसायिक मोठ्या प्रमाणात आहे जड वाहतूक बंद झाल्याने त्यांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत असे. ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना ही समस्या सांगितली त्यांनी याबाबतचा शासन व प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला.
सदर कालावधीत रेल्वे ब्रिजचे काम पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे पत्र प्राप्त झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. गुरुवार, २१ डिसेंबर पासून जड वाहतूक सुरु करण्यात आली आहे रात्री १२ वाजता पासून ते ४ वाजतापर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश राहील.
शहरातून जड वाहतूक सुरु झाल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.