रेखा कैथल
ब्युरो चीफ
राजुरा, दि. २३ डिसेंबर:- तालुक्यातील पांढरपौणी नजीकच्या वळणरस्त्यावर आज दुपारच्या सुमारास तिन वाहणांच्या धडकेत दुचाकीस्वार बापलेकाचा अपघात झाला; या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने रूग्णालयीन उपचार मिळावा, यासाठी भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे देवदूतासारखे धाऊन आले. देवराव भोंगळे यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात घेऊन आल्याने त्यांचेवर वेळेत उपचार होण्यास मदत झाली.
देवराव भोंगळे हे गडचांदूरहून आपला नियोजित कार्यक्रम आटोपून राजुऱ्याकडे मार्गस्थ असताना त्यांना पांढरपौणी नजिकच्या वळणरस्त्यावर तीन वाहणांचा अपघात झाल्याचे कळाले. या अपघातात मारोती कोहपरे (३३) आणि त्याचा पाच वर्षीय मुलगा नैतीक कोहपरे हे दोघेही गंभीर जखमी झाल्याचे दिसून येताच त्यांनी तातडीने या बापलेकाच्या मदतीला धावून जात स्वतःच्या गाडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे उपचारार्थ दाखल केले.