चंद्रपूर, दि. 2 : केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. जिल्हृयात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठक पार पडली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती पायघन, जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रशांत धोंगळे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. इंगळे तसेच डॉ. मंगेश गुलवाडे, सीएससी सेंटरचे जिल्हा समन्वयक स्वप्नील सोनटक्के व श्री. रमझान आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वकांक्षी योजना असून पारंपारिक उद्योजकांचा विकास साधण्याकरीता ग्रामसेवक व सरपंचांनी जास्तीत जास्त पारंपारिक कारागिरांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. तसेच योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी गावपातळीवर दवंडी देऊन, बॅनरच्या माध्यमातून सदर योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच ऑनलाईन सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोंदणी करण्याबाबतच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना :
योजनेची उद्दिष्टे : कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्यवृध्दी प्रदान करणे, व्यवसाय आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण आणि सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करुन देणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपिठ प्रदान करणे, जेणेकरून, त्यांना व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी मिळणे सोईचे होईल, आदी या योजनेची उद्दीष्टे आहे.
योजनेमधून नोंदणीकृत कारागिरांना मिळणारे लाभ :
पारंपारीक कारागीर म्हणुन शासनमान्यता प्रमाणपत्र आणि ओळखपत्राव्दारे विश्वकर्मा म्हणून मान्यता मिळेल. कौशल्य विकास (प्रशिक्षण), कौशल्य पडताळणीनंतर 5 ते 7 दिवस (40तास) मुलभत प्रशिक्षण, इच्छुक उमेदवारास 15 दिवस प्रगत प्रशिक्षण, दररोज 500 रुपये प्रशिक्षण विद्यावेतन आणि टुलकिट प्रोत्साहन म्हणून 15 हजार रुपये अनुदान देय राहील.
योजनेचे लाभार्थी : असंघटीत क्षेत्रात स्वंयरोजगार तत्वावर हात-अवजाराने काम करणारे कारागीर, 18 कुंटुंब-आधारीत पारंपारीक व्यवसायापैकी एका व्यवसायात गुंतलेला कारागीर, नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे वय किमान 18 वर्ष असावे. योजनेतंर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित राहतील. शासनसेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
पात्र कारागीर आणि व्यवसाय : सुतार/बोट निर्माता, लोहधातू, ब्राँझ, पितळ, तांबे, डायस, भांडी, मूर्ती बनविणारा, लोहार/हॅमर आणि टुलकिट मेकर, कुलुप बनविणारा, मुर्तिकार, स्टोन ब्रेकर, सोनार, कुंभार, मोची, शुस्मिथ, पादत्राणे कारागीर, गवंडी, ईतर जसे बास्केट, मॅट, झाडु निर्माता, काथ्याचा व्यवसाय करणारे, बाहुली आणि खेळणी निर्माता, न्हावी, माळी, परिट, शिंपी आणि मासेमारी जाळी बनविणारे या योजनेस पात्र आहे.
ऑनलाईन अर्ज पध्दती : योजनेतंर्गत लाभासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जवळच्या ग्रामपंचायत सी.एस.सी. केंद्रातून अर्ज करावा लागेल. युजर आयडी आणि पासवर्डव्दारे लॉगीन करून योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने मान्यता दिल्यानंतर शासनाकडून कारागीरांना ओळखपत्र देण्यात येईल व तदनंतर कारागीराला या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
आवश्यक कागदपत्रे : लाभार्थ्याच्या नोंदणीसाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक तपशील, शिधापत्रिका (नसल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड), अतिरिक्त कागदपत्रे अथवा माहिती लाभार्थ्याना एमएसएमई विभागाने विहीत केलेल्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त कागदपत्रे किंवा माहिती देणे आवश्यक राहील.