नुतन इमारतीतून सर्वसामान्यांच्या न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करा- पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे

0
12

 

 

ब्रह्मपुरी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन

 

चंद्रपूर, दि.28: सामान्य नागरिकांचा न्यायप्रणालीवर विश्वास आहे. न्यायालयाच्या एका निर्णयाने लोकांचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे लोक आशेने पाहत असतात. त्यामुळे या नुतन इमारतीतून सर्वसामान्यांच्या न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करावी असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी केले.

 

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, ब्रह्मपुरीचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी श्रीमंत चक्कर, सह. दिवाणी न्यायाधीश श्री.गुट्टे, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष हेमंत उरकुडे आदीं उपस्थित होते.

 

न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी अत्यानंद होत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले, असे सांगून पालक न्यायमुर्ती अविनाश घरोटे म्हणाले, अथक परिश्रमातून दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नवीन इमारत पूर्णत्वास आली आहे. ब्रह्मपुरी हे ऐतिहासिक शहर आहे. या तालुक्यास विद्यानगरी असे संबोधले जात असून शिक्षणाचे माहेरघर सुद्धा मानले जाते. जुन्या न्यायालयाची वास्तू ब्रिटिशकालून असून त्याचा वेगळा इतिहास आहे. इतिहासकालीन इमारतीमधून नव्या इमारतीत स्थानांतरित होणे, ही सुखद बाब आहे. न्यायालयात शिपाई पदापासून तर न्यायाधीश पदापर्यंत सर्वजण आपापली कार्य पार पाडत असतो. आपले कार्य प्रामाणिकपणे करून न्यायालयाचे नाव उज्वल करावे तसेच धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य सांभाळून कायद्याचे पालन करावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

 

ते पुढे म्हणाले, गौरवशाली इतिहास, समृद्ध वारसा, अनोख्या चालीरीती, परंपरा आणि चांगले न्यायाधीश व नामवंत वकिलांच्या सहयोगाने ब्रह्मपुरी शहराला उत्तम दर्जा बहाल केला आहे. ब्रह्मपुरी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणे, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळवणे हा संविधानाचा सर्वात मूलभूत सिद्धांत आहे. कायद्याचे ज्ञान, अनुभव त्यासोबतच नवीन सोयीसुविधा, संगणक, आर्टीफिशियल इंटेलिजन्सी या संसाधनाचा उपयोग करून पक्षकारांच्या केसेस निकाली काढण्याकरीता किती चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल व लवकरात लवकर न्याय देता येईल याची खात्री करावी, असे वकिलांना सांगितले. स्पष्टवादीता ही मानवाला कायम पुढे नेत असते. पक्षकारास कायद्याची खरी बाब समजावून सांगावी. त्यामुळे पक्षकाराचा आपल्यावरचा विश्वास दृढ होईल, असेही ते म्हणाले.

 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म म्हणाल्या, या कार्यक्रमाचा खरा कणा हा पक्षकार आहे. पक्षकार, वकील व न्यायाधीशांच्या सोयी-सुविधीसाठी ही वास्तू मूर्त स्वरूपात उभी आहे. या इमारतीच्या उभारणीत अनेकांचे सहकार्य लाभले. ब्रह्मपुरी शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा लाभलेला असून धार्मिक महत्व देखील आहे, असे त्या म्हणाल्या. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 

न्यायालयाच्या नुतन इमारतीची पाहणी:

 

यावेळी पालक न्यायमुर्ती अविनाश घरोटे यांनी ब्रह्मपुरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीची पाहणी केली. त्यासोबतच न्यायालयाच्या जुन्या इमारतीची देखील पाहणी केली.

 

पालक न्यायमूर्ती यांच्या हस्ते इमारत बांधकामास योगदान दिल्याबद्दल सत्कार:

 

न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामास योगदान दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता श्री. चहारे, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्रीमती वर्मा, कंत्राटदार के.सी.पटेल यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन तसेच हिंदू ज्ञानमंदिर, ब्रह्मपुरी येथील विद्यार्थिंनींनी महाराष्ट्र गीत सादर केल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी संदीप भस्मे, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी आर्शिया जुही याच्यांसह जिल्ह्यातील न्यायाधीश आदींची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे संचालन न्यायाधीश माधुरी केवलगोटे व ऋषिकेश हिंगणगावकर तर आभार दिवाणी न्यायाधीश श्रीमंत चक्कर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here