चंद्रपूर, दि. 6 : जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत केलेल्या कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. बैठकीला उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलीमा मंडपे, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, जलसंधारण अधिकारी (जि.प.) प्रियंका रायपुरे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठी तालुकानिहाय 237 गावांची निवड करण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील कामांचे पुनरावलोकन करावे. तालुकानिहाय गावांचे कृती आराखडे मागवून पुनश्च तपासून घ्यावे, तदनतंरच आराखडे सादर करावेत. या अभियानात कृषी, जलसंधारण, वनविभाग व जिल्हा परिषद जलसंधारण विभागाने राज्य व जिल्ह्याच्या योजनांची एकत्रित यादी करून कामाचे नियोजन करावे.
प्रत्येक विभागांनी गावांमधील नाला व तळे खोलीकरण, सिमेंट नाला बांधकाम, गॅबीयन बंधारे, शेततळे आदी कामे शोधून काढावीत. महत्त्वपुर्ण कामे नियोजन समितीच्या निधीतून करता येईल. वनविभागाने देखील त्यांच्याकडील कामांचे पुनरावलोकन करावे. कामांची निवड केल्यानंतर त्या कामांना 100 टक्के निधी उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करावे. पाण्याचे दुर्भिक्ष असणारी गावे जलयुक्त शिवार योजना 2.0 मध्ये प्राधान्याने घ्यावी. ज्या तालुक्यातील गावांमध्ये कामाचा वाव आहे त्यांना प्राधान्य दयावे.
यापुर्वी जलयुक्त शिवार अभियान 1.0 राबविण्यात आले होते. या अभियानात गावांचे आराखडे तयार करण्यात आले होते. त्यांचा आधार घेतल्यास संबधित यंत्रणाना कामे करणे सोपे जाईल, अशा सुचना बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी यंत्रणानिहाय कामांची माहिती जाणून घेतली.