चंद्रपूर- देशातील सर्वात मोठ्या ओबीसी समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक व व्यावसायीक विकासाला खड्डयात लोटण्याचे काम गेल्या 60 वर्षात झाले. भाजपाची नियत साफ असल्याने सर्वांची साथ व सर्वांचा विकास या भूमिकेतून मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात पहिल्यांदाच ओबीसींच्या उत्थानाचे, सर्वांगिन विकासाचे कार्य केले. ओबीसींकरीता अनेक कल्याणकारी योजना राबवित त्यांचे मागासलेपण दूर सारून त्यांना शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात प्रगतीचा मार्ग दाखवित राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे महान कार्य भाजपा सरकार व मोदीजींच्या राजवटीत झाले असल्याने भाजपा हा पक्षच खऱ्या अर्थाने ओबीसींचा तारणहार असून ओबीसी बांधवांनी काळाची पाऊले ओळखून भाजपाची सोबत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतिने ओबीसी संपर्क अभियानाअंतर्गत महात्मा गांधी जयंती दिनी (2 ऑक्टों.) सुरू झालेल्या ओबीसी जागर यात्रेचे चंद्रपूरात आगमन झाल्यानंतर महानगर ओबीसी मोर्चाच्या वतिने दि. 5 ऑक्टोंबर रोजी तुकूम येथील महेश भवनात आयोजित ओबीसी जागर महामेळाव्याला अहीर संबोधित होते. या ओबीसी जागर मेळाव्यास भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, प्रदेश महिला महासचिव अर्चना डेहनकर, प्रदेश उपाध्यक्ष सोनटक्के, रविंद्र चव्हाण, डॉ. प्रविण येनूरकर, रविंद्र उदासे, निलेश गुळधे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, प्रदेश महिला मोर्चा च्या महामंत्री अल्का आत्राम, माजी आमदारव्दय संजय धोटे, सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, ब्रिजभुषण पाझारे, रघुवीर अहीर, रमेश राजुरकर, नामदेव डाहुले, विवेक बोढे, विशाल निंबाळकर, विनोद शेरकी, वंदना संतोषवार, प्रभुती व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी सदर जागर यात्रा बाईक रॅली ने शासकीय विश्रामगृह पासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत कुच करीत सभास्थळी आली.
या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर म्हणाले की, देशात अनिर्बंध सत्ता उपभोगणाऱ्यांनी ओबीसींच्या हिताचे धोरण कधीही स्वीकारले नाही. काका कालेलकर, आयोग असो की, मंडल आयोग असो शिफारसी स्विकारल्या नाहीत त्यासाठी व्हि. पी. सिंह यांचे भाजपासोबत सरकार यावे लागले. 1993 मध्ये ओबीसी आयोग स्थापन झाले मात्र आयोगाला संवैधानिक दर्जा मिळण्यासाठी मोदीजींचे सरकार यावे लागले. आज मोदीजींच्या राजवटीत ओबीसींना वैद्यकीय, इंजिनियरींग व उच्च शिक्षणात आरक्षण मिळत आहे. या पुर्वी एससी, एसटी बांधवांना संवैधानिक अधिकार मिळायचा आज भाजपा राजवटीत ओबीसींना हा अधिकार बहाल केला गेला आहे. शेतीवर 80 टक्के ओबीसी आहे. मोदींनी कृषी मालाचे भाव दुप्पट केले. कारागीरांना विश्वकर्मा योजनेतून बळ दिला. कौशल्य विकासातून रोजगार निर्मीती केली. स्वदेशी उत्पादनास बळ दिले. यात ओबीसींचा मोठा वाटा राहणार आहे. त्यामुळे ओबीसींचे हित कोणत्या पक्षात आहे याचा विचार ओबीसी बांधवांनी करण्याची गरज असल्याचे हंसराज अहीर म्हणाले.
डॉ. आशीष देशमुख
डॉ. आशीष देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की, प्रधानमंत्री मोदीजींनी हंसराज अहीरांच्या रूपात ओबीसी आयोग अध्यक्ष बनवून ओबीसींचा गौरव केला आहे. ओबीसींच्या उत्कर्षासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी 22 जीआर काढले ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण करणारे भाजपाचे सरकार होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेत देशमुखांनी ओबीसींबद्दल उमाळा दाखविणाऱ्या वडेट्टीवारांनी ओबीसी मंत्री असतांना ओबीसींच्या हितासाठी काय केले? अशी पृच्छा करून त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका जाहिर करावी असे आव्हान दिले. त्यांचा ओबीसीप्रती असलेला कळवळा केवळ भुलथापा आहेत असेही ते म्हणाले. ओबीसींच्या उत्थानासाठी 4 हजार कोटी खर्च होत आहे. त्यामुळे ओबीसींची आर्थिक समृध्दी, विश्वकर्मा योजना व अन्य योजनेचा प्रसार व्हावा हा या जागर यात्रेचा उद्देश असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सागीतले.
संजय गाते
ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते म्हणाले की, देशात सर्वसमाजासाठी विकास मंत्रालय होते. मात्र ओबीसी यापासून वंचित होते. देवेंद्र फडणविसांनी मुख्यमंत्री होताच ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय दिला. अनेक उच्च अभ्यासक्रमात आज ओबीसींचा टक्का वाढला आहे. वैद्यकीय शिक्षणात भाजपा सरकारमुळे ओबीसींना 27 आरक्षण मिळाले आहे. 54 टक्के ओबीसींना काँग्रेस राजवटीत वाऱ्यावर सोडले होते. आज ओबीसींसाठी महाज्योती योजना कार्यान्वित आहे. विश्वकर्मा योजनेत 100 टक्के ओबीसी लाभार्थी आहेत. ओबीसी कल्याणाच्या अनेक योजना राज्य व केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे विरोधकांचे ओबीसींच्या उत्थानात काडीचेही योगदान नाही. भाजपा हाच ओबीसींचा तारणहार आहे. हे सांगण्यासाठी ही जागर यात्रा असल्याचे गाथे म्हणाले. यावेळी डॉ. अशोक जिवतोडे व अर्चना डेहणकर यांनीही भाजपा राजवटीत ओबीसींना मोठा न्याय मिळाल्याचे सागींतले.
यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची गणेश विसर्जन सोहळ्यात दृष्ये सादर करणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ व रोख रक्कम देवून सन्मान केला. या स्पर्धेत 41 हजाराचा प्रथम पुरस्कार जोड देउळ गणेश मंडळ, 31 हजाराचा व्दितीय पुरस्कार युवक गणेश मंडळ गंजवार्ड, 21 हजाराचा तृतीय विठ्ठल व्यायामशाळा गणेश मंडळ, चौथे हिवरपूरी बाल गणेश मंडळ व पाचवे जय बजरंग गणेश मंडळास पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या जागर मेळाव्याच्या यशस्वितेसाठी ओबीसी मोर्चाच्या महानगर पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र गुरनूले यांनी केले. संचालन राहूल बनकर यांनी तर आभार शशिकांत म्हस्के यांनी मानले. या जागर मेळाव्यास ओबीसी समाजातील बहुसंख्य नागरीक तसेच भाजपा, भाजयुमो महिला आघाडी व विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.