चंद्रपूर- वरोरा तालुक्यातील शेकडो गावातील शेतकऱ्यांचे सोयाबिन पिक करपासारख्या अज्ञात रोगाने शंभर टक्के उध्दवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे हितैषी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 22 रोजी दिल्लीहून चंद्रपूरास परततांना खांबाडा या गावास भेट देवून उध्दवस्त झालेल्या सोयाबिन पिकाची शेतावर जावून पाहणी केली. शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत तक्रारी करूनही तालुका प्रशासनाचे अधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली नसल्याने प्रशासनाच्या भुमिकेवर रोष व्यक्त करीत या नुकसानीचा त्वरीत सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे मदतीकरीता सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी हंसराज अहीर यांनी खांबाडा येथील नामदेवराव धोटे व महादेव चाफले यांच्या शेतीवर जावून पिकांची पाहणी केल्यानंतर पिडीत शेतकऱ्यांनी करपासदृष्य रोगामुळे खांबाडासह वाटोळा, कोसरसार, बारव्हा, पट्टापूर, बोपापूर, रामपूर, वडगांव आदी गांवातील मागासवर्गीय, दलित, आदिवासी शेतकऱ्यांचे संपुर्ण सोयाबिन रोगाने उध्दवस्त झाल्याची माहिती दिली.
सन 2008 मध्ये लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यंदा करपा सदृष्य अन्य रोगामुळे सोयाबिन संपूर्ण उध्दवस्त झाल्याने 2008 ची पुनरावृत्ती झाली असून हा रोग जिल्हाभर सर्वत्र पसरण्याची स्थिती निर्माण झाली असल्याच्या तक्रारी येत असून या संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज असल्याने जिल्हा प्रशासनाने या संकटाची गंभीरपणे दखल घेवून तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण व नोंदणी घेण्याचे सुचनावजा आदेश हंसराज अहीर यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
खांबाडा शिवारात नुकसानीची पाहणी करतांना हंसराज अहीर यांच्या समवेत भाजप पदाधिकारी माजी जि.प. सदस्य राजु गायकवाड, वसंता बावने, संतोष उरकुडे, अशोक ताजने, इन्द्रपाल ताजने, डॉ. मोरेश्वर राऊत व गांवातील पिडीत शेतकरी बांधव उपस्थित होते.