चंद्रपूर:- छट पूजा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, आपली श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंबाचे बळ एकत्र येण्याचा पर्व आहे. आपल्या छट पूजेचा उत्सव हा सूर्यदेवाच्या आराधनेचा पवित्र सोहळा असून, सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात प्रकाश, ऊर्जा, आणि समृद्धी नांदावी, अशी कामना करत प्रकृतीचे महत्त्व पटवून देणाऱ्या छट पूजेसाठी चंद्रपूरातील घाटांचा विकास करण्याचा आपला संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
दर वर्षी प्रमाणे यंदा ही चंद्रपूरात छट पूजा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रामाळा तलाव, महाकाली काॅलरी, लालपेठ शिव मंदिर, दुर्गापूर येथे छट पूजेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून पूजा अर्चना केली.
यावेळी ते म्हणाले, “चंद्रपूरात उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आज आपला पवित्र सण आहे. आपण नेहमीच या सनानिमित्त आपल्याकडून आलेल्या सूचनांची दखल घेतली आहे. घाट स्वच्छता आणि सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नेहमीच आमचे प्रयत्न राहिले आहेत. या समाजाचे आपल्यावर विशेष प्रेम राहिले आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्व समाजाला समान न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य राहील आणि पुढेही आपल्या हाकेला साथ मिळणार,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
छट पूजेचा पवित्र पर्व आपल्याला संयम, श्रद्धा आणि सहनशीलतेची शिकवण देतो. सूर्यदेवाच्या उपासनेतून मिळणारी ऊर्जा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रेरणा देते. छट पूजा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, आणि मातृशक्तीच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे. माताभगिनींनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी घेतलेले हे तप, हे व्रत यामध्ये एक समर्पण भाव असतो. त्यांचे धैर्य आणि श्रद्धा हे समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.