दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात युवक, महिलांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश..!
निवडणुका जवळ येताच आपली ऊर्जा आणि उत्साह अधिक वाढत आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून आपल्यावर जो विश्वास आहे, तो या निवडणुकीत सिद्ध करण्याची संधी आपल्याला पुन्हा मिळाली आहे. आजच्या या पक्ष प्रवेशानंतर नक्कीच पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. एकमेकांच्या सहकार्याने, निष्ठेने, मेहनतीने आणि कर्तव्यनिष्ठेने आपण या निवडणुकीत ऐतिहासिक विजय खेचून आणू, असा ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
तुकूम मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक युवक आणि महिलांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला संबोधित करताना आ. जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार, शिवसेना महिला जिल्हा महानगर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर, महानगर अध्यक्ष भरत गुप्ता, भाजपचे माजी नगरसेवक अजय सरकार, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, माजी नगरसेवक रामपाल सिंग आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षात अनेक नवे कार्यकर्ते आपल्यात सामील होत आहेत. आपल्या विचारधारेला बळकटी देण्यासाठी आणि आपला प्रवास अधिक दृढ करण्यासाठी आज येथे उपस्थित असलेल्या नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत आहे.
भाजप पक्ष केवळ एक राजकीय संघटना नाही, तर एक विचारधारा आहे. आपल्या देशाच्या, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित असलेल्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. भाजपच्या प्रत्येक सदस्याने देशसेवा, समाजसेवा, आणि राष्ट्रधर्म या तत्त्वांवर आधारित कार्य केले आहे. आजपासून तुम्ही या पक्षाचा एक अविभाज्य घटक आहात. तुम्हाला केवळ पक्षाच्या यशात नव्हे, तर देशाच्या विकासात मोठी भूमिका निभवायची आहे. भाजपचे कार्यकर्ते म्हणून आपले ध्येय केवळ सत्ता मिळवणे नसून जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून देशाच्या विकासाला दिशा देणे आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
भाजप पक्षात कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे नेहमीच मूल्य राहिले आहे. तुम्ही समाजासाठी काम करत असाल तर पक्षाचा पूर्ण पाठिंबा नेहमीच तुमच्यासोबत असेल. तुमची ऊर्जा, तुमचा उत्साह, आणि तुमची निष्ठा भाजपच्या या संघटनेला अधिक शक्तिशाली बनवेल. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारतीय जनता पक्षाला विजयाच्या शिखरावर पोहोचविण्यात आपण नक्कीच यशस्वी होणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी अनेक युवक, महिला आणि पुरुषांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.