चंद्रपूर: निराधार आणि गरीबांच्या सेवेसाठी झटणाऱ्या आणि समाजसेवेचे प्रतीक असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या पार्थिवावर आज सकाळी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अम्मा यांनी काल सकाळी चंद्रपूरच्या राजमाता निवासस्थानी सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूर येथील बिनबा गेट शांतीधाम येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक, आणि राजकीय नेते उपस्थित होते. अंत्यविधीमध्ये आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांचे छोटे बंदू प्रशांत जोरगेवार यांनी आपल्या मातोश्रींना अग्नी दिला. तत्पूर्वी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. अम्मांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. आज सकाळी 10 वाजता कोतवाली वार्ड येथील मातोश्री निवासस्थानातून अम्मांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर बिनबा गेट येथील मौक्षधाम येथे अम्मांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी अम्मा टिफिन परिवारासह हजारो नागरिकांनी नमत्या डोळ्यांनी अम्मांना अखेरचा निरोप दिला.
अम्मा यांचा “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा की दुकान” या उपक्रमांनी चंद्रपूरात समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. गरजू, निराधार, आणि गरीब व्यक्तींना मदत करण्यासाठी त्या झटल्या. या उपक्रमातून अनेकांना रोजीरोटी मिळाली आणि समाजात एक नवा विश्वास निर्माण झाला. त्यांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे यावेळी शोकसभेत नागरिकांनी म्हटले. अम्मांचे कष्टमय आणि सेवाभावी जीवन समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे राहील, असे नागरिकांनी भावुकतेने सांगितले.
सर्वधर्मीय धर्मगुरूंची प्रार्थना
अम्मांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी राजमाता निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वधर्मीय धर्मगुरूंनी प्रार्थना करत अम्मांना आदरांजली अर्पण केली. यात हिंदू धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू आणि शीख धर्मगुरूंनी प्रार्थना केली.