कोल इंडियाद्वारे पोस्टींग एसओपीमध्ये बदल.!
आश्रीत विवाहीत मुली/बहीण/भाऊ यांचा नोकरी प्रश्न निकाली..!
१२वी उत्तीर्णांसाठी सुरक्षाकर्मीचे पद ऐच्छिक केले जाईल..!
नागपूर/चंद्रपूर/यवतमाळ:- नागपूर येथील आयबीएम मुख्यालयात दि. ०७ ऑक्टोंबर २०२४ रोजी केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी भेट घेतली. कोल इंडिया अध्यक्ष प्रसाद यावेळी उपस्थित होते.
कोलकत्ता येथे कोल इंडिया सोबत हंसराज अहीर यांनी बैठक घेवून उपस्थित केलेल्या विविध मुद्दे व अन्य विषयांवर कोळसा मंत्र्यांसोबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी २०२१ च्या पोस्टींग एसओपीमध्ये बदल करून नवीन एसओपी द्वारे पोस्टींग करण्यात येईल असे सांगण्यात आले. यामध्ये शैक्षणिक पात्रता धारकांना युजी पोस्टींगमधून वगळण्यात यावे असेही अहीर यांनी सुचवले.
बल्लारपूर क्षेत्रातील नार्थ-वेस्ट, गोवरी सेंट्रल, गोवरी-पोवनी (एकत्रीकरण), वणी क्षेत्रातील पैनगंगा एक्सटेन्शन, कोलगाव ओपनकास्ट या प्रकल्पांबाबत लवकरच सीबी अॅक्टनुसार अधिसुचना जाहिर करणे, धोबे (शिवनी), चिंचोली रिकास्ट, या परियोजनांना आर्थिक मोबदल्यासोबत नोकरीचे लाभ देण्याचा निर्णय घेणे, ग्रँड डॉटर (नात) व सुनेला, जमिन अधिग्रहणात नोकरीस मान्यता देण्याचे त्वरीत निर्णय घेणे तसेच सर्व पूनवर्सन प्रस्तावित गावातील (सास्ती, पोवनी, गाडेगाव, कोलार पिपरी, पिंपळगाव, व अन्य) उर्वरित जमीन पूर्णतः अधिग्रहीत करणे, यावर सुध्दा सखोल चर्चा केली.
कोळसा चोरी व वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करणे, ओबी कंपनीत ठेकेदारी रोजगारात महाराष्ट्र शासनाचा ८०:२० चा जीआर चे तंतोतंत पालन करणे यासाठी निर्देश देण्याचे सुचित केले.
नवीन प्रकल्पातील अधिग्रहीत जमिनींना NCL च्या धर्तीवर वाढीव दर लागू करणे तसेच वेकोलितील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षावरून ६५ वर्षापर्यंत वाढविणे यासह अन्य महत्वपूर्ण विषयावर निर्णय घेण्याबाबत सुध्दा मंत्री महोदयांशी हंसराज अहीर यांनी सविस्तर चर्चा केली.