चंद्रपूर:- आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता की एकता दौड या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता गांधी चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातील 1000 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा संपल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी नगरसेवक पप्पू देशमुख, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव सुरेश अडपेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, विमल कातकर, योग नृत्य परिवारचे गोपाल मुंधडा, प्रविण सिंग, आशा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूरात 7 ऑक्टोंबर पासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी सहा वाजता गांधी चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर सर्व धावकांनी नियोजित मार्गावर धावायला सुरुवात केली. गांधी चौक, जटपूरा गेट, रामनगर, जनता कॉलेज, लखमापूर हनुमान मंदिर, बापट नगर मार्गे बंगाली कॅम्प, बायपास, अष्टभुजा, हिंग्लाज भवानी, राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज मार्गे माता महाकाली मंदिर आणि पुन्हा गांधी चौक असा 21 किलोमीटरचा अंतर पूर्ण करत सर्व स्पर्धक गांधी चौक येथे पोहचले.
स्पर्धेत 51,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक, 31,000 रुपयांचे द्वितीय पारितोषिक, 21,000 रुपयांचे तृतीय पारितोषिक, 11,000 रुपयांचे चतुर्थ पारितोषिक आणि 5,000 रुपयांचे पाचवे पारितोषिक देण्यात आले. पुरुष गटातून सोलापूर येथील अरुण राठोड यांनी 1 तास 5 मिनिटे 56 सेकंदात 21 किमी अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. नागपूर येथील नागराज रकसने यांनी 1 तास 9 मिनिटे 25 सेकंदात दौड पूर्ण करत दुसरा क्रमांक मिळवला, तर गोंदिया येथील निखिल टेर्मुने यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
महिला गटातून भंडारा जिल्ह्यातील तेजस्वीनी लांबकाने हिने ही दौड 1 तास 27 मिनिटे 36 सेकंदात पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला. गडचिरोली जिल्ह्यातील प्रियंका ओक्सा हिने 1 तास 55 मिनिटात दौड पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. चंद्रपूर जिल्ह्यातील अभिलाषा भगत हिने तिसरा क्रमांक मिळवला.
50 वर्षीय काकू आणि 75 वर्षीय आजोबांनी वेधले लक्ष
या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला होता. नागपूर येथील 75 वर्षीय डोमा चाफले यांनी 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. चंद्रपूर येथील 50 वर्षीय ताराबाई उराडे यांनीही सहभाग घेत दौड पूर्ण केली. त्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.