म्युझिकल चेअर रोलर स्केटिंग स्पर्धेच्या माध्यमातून तरुण पिढीत क्रीडाक्षेत्रातील अभिरुची वाढवण्यासाठी एक नवा दृष्टिकोन मिळेल आणि यातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होतील. खेळाडू म्हणून जिंकणे हे महत्त्वाचे असले तरी, सहभाग हा अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंद्रपूर जिल्हा म्युझिकल चेअर रोलर संघटना यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सुनिता लोठीया, सुधाकर अंभोरे, प्रशांत भारती, कुणाल चहारे, तुकाराम तुमरे, सचिन अमीन, गजानन बंसोड, शिवाजी चव्हाण आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “स्केटिंग ही केवळ एक खेळाची कला नाही, तर ती शारीरिक आणि मानसिक शिस्तीचा, आत्मविश्वासाचा आणि कठोर परिश्रमाचा एक उत्तम नमुना आहे. आज या मैदानावर एकत्र आलेले स्पर्धक आपल्या परिश्रमाने आणि समर्पणाने इथे पोहोचले आहेत.
तुमची मेहनत आणि जिद्दच तुम्हाला यशस्वी करेल. स्पर्धेच्या प्रत्येक क्षणात आपण आपल्यातील सर्वोत्तम कौशल्य दाखवण्यासाठी प्रयत्न करा. खेळाडू म्हणून जिंकणे हे महत्त्वाचे असले तरी, सहभाग हा अधिक महत्त्वाचा आहे. या स्पर्धेतून तुम्हाला शिकायला मिळेल, नवीन मित्र बनतील, तुम्हाला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल,” असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.