चंद्रपूर, दि. 9 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेचे पूर्व प्रशिक्षण घेतले जाते. सद्यस्थितीत येथे असलेल्या सत्र 2 च्याबॅच मधील उमेदवारांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) डी.एस. कुंभार होते.
यावेळी त्यांनी उपस्थित उमेदवारांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देवून स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य आणि जिद्द आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच चिकाटी, मुलाखत तंत्र, परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी करिअरबाबत मोठे स्वप्न नक्कीच बघावे. तसेच कठीण परिश्रम करून अभ्यासाचे नियोजन करावे, तरच यश प्राप्त करता येते, असा यशाचा मंत्र दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी यांनी सुद्धा आदिवासी संस्कृतीबाबत वेगवेगळे विचार मांडले. संचालन कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी श्री. गराटे यांनी केले तर आभार श्री राठोड यांनी मानले. यावेळी शिक्षकवृंद मंगेश गौरकार व सचिन तोडासे उपास्थित होते.