चंद्रपूर ०५ जुलै : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असुन जनावरांना मोकाट सोडुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर सरळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे.