१ जुलैपासुन ” एक पौधा एक विद्यार्थी ” व ” वृक्षमित्र विद्यालय ” स्पर्धा विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण शाळांना रोख बक्षिसे

0
8

चंद्रपूर २६ जुन – शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लावणे व त्यांना जगविणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे याची जाणीव शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने  ” एक पौधा एक विद्यार्थी ” ही स्पर्धा शालेय स्तरावर व शाळांसाठी ” वृक्षमित्र विद्यालय ” स्पर्धा येत्या १ जुलैपासुन चंद्रपूर महानगरपालीकेतर्फे राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल यांनी शाळांसाठी आयोजित बैठकीत दिली.
शहराचे ग्रीन झोन वाढविण्यास घेण्यात येणाऱ्या एक पौधा एक विद्यार्थी स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करणे,वृक्षाचे संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार असुन स्पर्धेसाठी लागणारी आवश्यक ती झाडे मनपातर्फे पुरविण्यात येणार आहे. सहभागी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दिले जाणार असुन त्या झाडाचे संगोपन व संवर्धन त्या विद्यार्थ्याला करावयाचे आहे. वृक्षाचे संगोपन कसे सुरु आहे याची माहिती संबंधित शिक्षकांद्वारे घेतली जाणार असुन झाडाचे संगोपन करून वाढविल्याबद्दल प्रमाणपत्र,ट्रॉफीसोबतच अतिरिक्त २० गुणसुद्धा शाळेतर्फे दिले जाणार आहे.
वृक्षमित्र विद्यालय स्पर्धेत सर्व शासकीय तसेच खाजगी शाळा सहभागी होणार असुन अधिकाधिक वृक्षलागवड व उत्तमरीत्या संगोपन करणाऱ्या शाळांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. वर्ग १ ते ५,वर्ग ६ ते ८ व वर्ग ९ ते १२ अश्या तीन गटात शाळांना सहभागी होता येणार असुन प्रत्येक गटातील ३ विजेत्यास ११ हजार,७ हजार व ५ हजार रुपये बक्षीस व सर्व सहभागी शाळांना प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे. वृक्षारोपण,वृक्ष संरक्षण ,वृक्षारोपण दत्तक योजना (शिक्षक/प्राचार्य) ,वृक्ष संगती विशेष फुल / प्रजातीची लावणे, वृक्षारोपण और पर्यावरण संबंधी वॉल पेटींग,उचित जागेवर वृक्षारोपण,जनजागृती उपक्रम,कार्याची प्रसिद्धी, स्मृती वन, आंनदवन तयार करणे इत्यादी निकषांवर स्पर्धेचे गुणांकन केले जाणार आहे.

नोंदणी कशी करावी –
९०६७३४९४४२ या क्रमांकावर संपर्क करून अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधुन नोंदणी करता येईल.

कोणत्या प्रकारची झाडे दिली जाणार –
फुलांची झाडे – जास्वंद,पारिजात,चाफा इत्यादी
फळांची झाडे – आंबा,जांभूळ,डाळिंब,आवळा इत्यादी
त्याचप्रमाणे वड,पिंपळ,कडुलिंब इत्यादी प्रकारची विविध झाडे दिली जाणार आहेत.

मानवी जीवनातील वृक्षाच्या महत्वासंबंधी सर्व माहिती पुस्तकांत आहे,मात्र शालेय शिक्षकांच्या माध्यमातुन वृक्षलागवड व संगोपनाद्वारे जेव्हा हे प्रत्यक्षरीत्या घडतांना विद्यार्थी पाहतो, तेव्हा वृक्षांविषयी जिव्हाळा निर्माण होऊन वृक्षाचे महत्व त्याच्या मनावर बिंबते. चंद्रपूर शहरातील सर्व विद्यार्थी शालेय जीवनातच पर्यावरणाप्रती जागरूक व्हावे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे – आयुक्त विपीन पालीवाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here