बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेला देशातील अग्रगण्य संस्था करणार…..! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास.

0
10

 

 

चंद्रपूर, दि. 23 : बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली (जि.चंद्रपुर) येथील बीआरटीसी ही देशात एकमेव संस्था आहे. संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना देणारी देशातील ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास नक्की येईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

वन अकादमी येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बीआरटीसी) आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, भूषण येरगुडे, अपर संचालक मनिषा भिंगे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते.

 

4 डिसेंबर 2014 रोजी बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती झाली असून राज्याच्या वनविभागाची ही एक स्वायत्त संस्था आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात ताडोबा – अंधारी हा जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबातील बफर झोनमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अर्ध्या क्षेत्रात अनुदानावर बांबू लागवडीसाठी प्रवृत्त करावे. सोबतच भाजीपाला क्लस्टर सुद्धा देता येईल का, याचा विचार करावा.

 

या संस्थेतील फायर फायटिंग व्यवस्था अतिशय अत्याधुनिक, तंत्रशुद्ध व अचूक असावी. सादरीकरणांमध्ये ज्या बाबी ठरविण्यात आल्या आहेत, त्याचे प्रमुख उद्दिष्ट ठरविणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत सविस्तर आराखडा तयार करून टाटा ग्रुप, अदानी ग्रुप, दालमिया यांच्याशी सुद्धा बांबू उत्पादनाबाबत चर्चा करावी. सोबतच बांबू लागवड आणि उत्पादनासाठी लघु व सूक्ष्म उद्योग (एम. एस. एम. ई.)अंतर्गत काही नियोजन करता येते, का त्याचा सुद्धा अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा. बांबू लागवड, उत्पादन व त्यातून कौशल्य विकास या संदर्भात पीएम विश्वकर्मा योजनेत या बाबींचा समावेश करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

 

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा व वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर म्हणाले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने देशात बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था (बीआरटीसी) ही भारतात एकमेव संस्था उभी राहिली आहे. प्रशिक्षणासोबतच शिक्षण, त्याचे सादरीकरण त्यातून रोजगार याबाबतीत ही संस्था देशपातळीवर नावारूपास येणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या संस्थेमध्ये बांबू विषयक प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

सादरीकरणात बीआरटीसी चे संचालक अशोक खडसे म्हणाले, समाज, नागरिक आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी बांबूक्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण करणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बीआरटीसी अंतर्गत बांबू टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा, शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि बांबू व्होकेशनल ट्रेनिंग देण्यात येत आहे. सोबतच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या सहकार्याने सहा ठिकाणी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरू करण्यात आले आहे. तसेच पोंभूर्णा येथे बांबूपासून अगरबत्ती निर्मिती युनिट सुद्धा कार्यान्वित करण्यात आले आहे. बांबू पासून निर्माण करण्यात आल्या वस्तूंची विक्री चंद्रपूर, मोहर्ली, कोलारा आणि बल्लारपूर येथे होत आहे.

 

भविष्यात येथे विविध प्रशिक्षण आयोजित होणार असल्यामुळे वसतिगृहाची निर्मिती, इंडक्शन किचनसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू, आग प्रतिबंधक व्यवस्था व त्याची देखभाल दुरुस्ती, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, इंटरनेट आणि वायफाय सुविधा, डिजिटल लॅब, टिशू कल्चर लॅब, ऑडिटोरियम, सौर ऊर्जा व्यवस्था, वाहतुकीसाठी 30 आसन व्यवस्थेची बस, परिसरात सादरीकरणासाठी डिस्प्ले युनिट्स, एक्जीबिशन हॉल, आरोग्य केंद्र, क्रीडा सुविधा, कंप्यूटर लॅब, लायब्ररी, आदींचा विस्तार करण्यात येणार आहे.

 

सन 2017 पासून डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून जून 2024 पासून विद्यार्थी क्षमता 30 करण्यात आली आहे. सन 2023 – 24 मध्ये बांबू निर्मिती, हॅंडीक्राफ्ट आणि कौशल्य विकास, फर्निचर बनविणे, निवासी व अनिवासी शेतकरी प्रशिक्षण, बांबूपासून ज्वेलरी, बास्केट, आदी संदर्भातील 17 प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले असून यात 516 नागरिक सहभागी झाले होते. आगामी काळात नवीन फॉरेस्ट गार्ड साठी बांबूबाबत मूलभूत प्रशिक्षण, विदर्भ आणि राज्यस्तरावरची कार्यशाळा, बांबू क्षेत्रातील उत्कृष्ट कारागीर आणि तज्ञांद्वारे कॉन्फरन्स, व्होकेशनल ट्रेनिंग, शेतकरी ट्रेनिंग आदी घेण्याचे नियोजन आहे, असे अशोक खडसे यांनी सांगितले.

 

बॉटनिकल गार्डनच्या नियामक मंडळाची सभा : विसापूर येथे असलेल्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनच्या नियामक मंडळाची सभा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रस्तावित बाबींना मान्यता देऊन उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बॉटनिकल गार्डनबाबत क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here