कोरपना तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ट्रॅक्टर, हायवाने वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष

0
17

 

कोरपना: तालुक्यात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचोरी सुरू असून याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील परसोडा, कोठोडा, कोडसी, व इतर परिसरातील गावातील 10 ते 20 ट्रॅक्टर तसेच हायवाद्वारे रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नदी व नाल्यातून रेती चोरी होत आहे. याशिवाय मुरुम चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे.

दररोज शेकडो ब्रास रेती व मुरूमची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. यातून रेती तस्करांनी चांगलीच माया जमवली असून महसूलचे काही कर्मचारी व पोलीस विभागाच्या काही कर्मचा-यांना

हाताशी धरून हा गोरखधंदा सुरू आहे. परसोडा, कोठोडा, कोडशी येथील रेती तस्करांकडून पैनगंगा नदीच्या तिरावरून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तसेच हायवाद्वारे खुलेआम रेतीचोरी सुरू आहे.

धोपटाळा, कोरपना, कातलाबोडी नाल्यातून रात्री 11 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत दररोज लाखो रुपयांची रेती चोरी करीत आहे. रेती चोरटे गरजू लोकांना 7 ते 8 हजार रुपये प्रमाणे विक्री करत आहे. कधी काळी एक वेळेच्या जेवणाची भ्रांत असणा-या तस्करांनी या गोरखधंद्यातून आज चांगलीच माया गोळा केली आहे.

महसूल व पोलीस विभाग काय करत आहे?

राजरोसपणे रेती व मुरूम चोरी करून त्याची वाहतूक होत असतानाही यांच्यावर क्वचित कार्यवाही होते. परिसरातील अनेक रेती चोरट्यांनी रेतीचे साठेसुद्धा करून ठेवल्याची माहिती आहे. रेती चोरीमध्ये राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे हे विशेष. रेती तस्करांना महसूल व पोलीस विभागाच्या काही कर्मचा-याचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांचे हायवा, ट्रॅक्टर असल्याची गुप्त माहिती आहे.

यापूर्वी रेती तस्करी करणा-यांवर एल.सी.बीच्या चमूने मोठ्या प्रमाणात कार्यवाही केली होती. परंतु गेल्या काही दिवसा पासून रेती चोरी करणाऱ्यांर कार्यवाही होत नसल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. याकडे मंडळ अधिकारी, तलाठी हेसुद्धा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

या प्रकरणी वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन रेती व मुरूम चोरट्यांवर कडक कार्यवाही करावी तसेच रेतीचोरीला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी अपेक्षा जनता करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here