चंद्रपूर:- सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून गेली. मला माते सारखे प्रेम त्यांनी दिले. मी सर्वोदय शिक्षण मंडळाचा विश्वस्त बनावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजीवन स्मरणात राहील. शिक्षण क्षेत्रात त्यांचे असलेले योगदान अतुलनीय आहे. आज त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून माझ्या सह अनेकांचे मातृतुल्य छत्र हरपले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
पक्षाघाताचा झटका आल्यामुळे 20 दिवसांपूर्वी सुधाताई यांची प्रकृती बिघडली. तेव्हा आम्ही त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात घेऊन गेलो. तेथे त्यांना दाखल केले. त्यांच्यावर यशस्वी शत्रक्रिया झाली. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मी सतत कुटुंबियांच्या संपर्कात होतो. मात्र आज अचानक त्यांचे निधन झाल्याची दु:खद वार्ता आली. त्यांच्या अशा जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्वतःच राहतं घर कॉलेजसाठी देत, त्या भाड्याच्या खोलीत राहायच्या, इतक्या मोठ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा असूनही त्यांनी कधीही याचा फायदा घेतला नाही. गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असायच्या. त्यांच्या अशा निघून जाण्याने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आपल्या शोक संदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.