जिल्हाधिका-यांची शिष्ट मंडळाने भेट घेत केली मागणी
चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित “जाणता राजा” महानाट्य चे प्रयोग पाहण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे पास काही ठरावीक प्रेक्षकांपर्यंच पोहचले आहे. त्यामुळे या नाट्याच्या माध्यमातून महाराजांचा शुर इतिहास पाहण्याची ईच्छा असलेल्या सर्व सामान्य नागरिकांना नाट्य प्रयोगापासून वंचित राहावे लागत आहे ही बाब लक्षात घेता सदर नाट्य प्रयोग दोन दिवस वाढविण्यात यावा, विना पास नागरिकांना प्रवेश देण्यात यावा आणि प्रेक्षक संख्या 25 हजार करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या एका शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेतली असून सदर मागणीचे निवेदन दिले आहे. या शिष्टमंडळात वंदना हातगावकर, जितेश कुळमेथे, आशा देशमूख, आशु फुलझेले, जय मिश्रा आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग, महासंस्कृती व चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित महानाट्य “जाणता राजा” महानाट्य चे प्रयोग दिनांक ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान चांदा क्लब ग्राउंड, येथे आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवरायांवर आधारित सदर महानाट्याचे प्रयोग दर्शकांना बघण्यासाठी प्रशासनातर्फे पासेस वाटप केले आहे. सदर पास शिवाय नागरिकांना हा नाट्य प्रयोग पाहता येणार नाही. मात्र सदर महानाट्य प्रयोग पाहण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना पास उपलब्ध झाले नाही. सदर पास कुठून मिळवायचे याबाबत नागरिकांना अद्यापही माहिती नाही. तर अनेक ठिकाणी पासेस संपले व उपलब्ध नाही असे सांगण्यात येत आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे शिव छत्रपती महाराजांचा शूरवीर इतिहास प्रत्येक घरी पोहचावा या उद्देशातून शासनाच्या वतीने आयोजित “जाणता राजा” या महानाट्य प्रयोगाचा मूळ उद्देश यशस्वी होणार का याबाबत शंका उपस्थित होत आहे.
ही बाब लक्षात घेता आणि चंद्रपूरकरांच्या भावनांचा आदर करत सदर नाट्यप्रयोग आणखी दोन दिवस वाढविण्यात यावा. नाट्य प्रयोगाची प्रेक्षक संख्या २५ हजार करण्यात यावी व पासेस व्यवस्था बंद करून हे महानाट्य सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी मोकळे करण्यात यावे. यावेळी अव्यवस्था होऊ नये यासाठी उत्तम नियोजन शासनाच्या वतीने करण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.