पदमापूर येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन
चंद्रपूर:- आपण इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या युगात जगत असतांना जिवनाच्या मुल तत्वांकडून दुरावत जात आहोत. अशात स्काउटिंग गाइडिंग ही एक विशिष्ट तरुण व्यक्तिमत्व विकास संस्था युवकांच्या जिवनाला दिशा देण्याचे काम करत आहे. एकंदर विचार केला असता स्काउट्स गाईड्सच्या माध्यमातून तरुणांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर भारत स्काऊट गाईड, जिल्हा कार्यालय, बहुजन हिताय फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पदमापूर येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. स्काउटचे माजी मुख्यालय आयुक्त प्रा. सुर्यकांत खनके, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामपाल सिंग, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, दिलीप वावरे, विजयराव टोंगे, रुपा ताकसांडे, पद्मापूर च्या सरपंचा उज्वला तापरे, संजय यादव, रुद्र नारायण तिवारी, शांताराम उईके, चंद्रकांत भगत, यशवंत हजारे, रंजाना किन्नाके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आजचा युवक मैदानी खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासून त्यांच्यातील कला गुणांचा शोध घेत त्यांना आवड असलेल्या खेळांसाठी त्यांना प्रोत्साहित केल्या गेले पाहिजे. विद्यार्थांनी स्काऊट गाईड मध्ये मोठया उत्साहाने सहभाग घेतला पाहिजे. यात जीवन जगण्याची पध्दतीचे शिक्षण दिल्या जाते ते भविष्यात विद्यार्थांना उपयुक्त ठरेल असे ते यावेळी म्हणाले.
स्काऊट गाईड ही चळवळ ३ ते २५ वयोगटातील मुले, मुली, तरुण पुरुष आणि महिलांसाठी मानसशास्त्रावर आधारित प्रशिक्षण आणि क्रियाकलाप देते. त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत करते आणि त्यांना स्थानिक, राष्ट्रीय, जबाबदार सदस्य बनण्यासाठी तयार करते. देशाचे एकनिष्ठ नागरिक राहून स्थानिक, राष्ट्रीय आणि जगभरात एकोपा, परस्पर आदर आणि सहकार्याचा प्रचार करण्याचे काम यातुन केल्या जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. असे आयोजन आपण नियमीत केले पाहिजे हे समाज हिताचे कार्य असुन यासाठी लोकप्रतिनीधी म्हणून मी सदैव आपल्या पाठीशी असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्काउड गाईच्या सदस्यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.