चंद्रपूर:- केपीसीएलच्या बरांज कोलमाईन्स निगडीत ओबीसी व अन्य स्थानिक कंत्राटदार, कामगार तसेच प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित आर्थिक देणी त्वरीत देण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आयोगाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात दि. 13 डिसेंबर, 2023 रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीस उपस्थित कोल इंडीयाच्या वरीष्ठ अधिका-यांना दिले.
सदर बैठकीस आयोगाचे सदस्या भुवनभुषण कमल, आयोगाचे सचिव, कोल मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व अन्य वरीष्ठ अधिकारी तसेच सिंगरेनी कोलचे सीएमडी, नेयवेली लिग्नाईट मायनिंगचे सीएमडी या बैठकीस उपस्थित होते. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाव्दारे केपीसीएल विषयक प्रलंबित प्रश्नी दि. 22 जुलै व 31 ऑक्टोंबर 2023 रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेतली होती. या पार्श्वभुमीवर आयोगाने दिल्ली येथे सदर बैठकीचे आयोजन करुन स्थानिक कंत्राटदार, खाण प्रकल्पग्रस्त व कामगारांना त्यांची थकीत राशी देवून न्याय देण्याचे निर्देश दिले.
केप्पीसीएलने प्रलंबित देणीकरीता कोल मंत्रालयात 113 करोड रूपये जमा केले असून या रकमेतून ही थकीत राशी देण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. येत्या 20 दिवसात या विषयावर पुन्हा बैठक घेवून कार्यवाहीचा आढावा घेतल्या जाईल असेही आयोगाने यावेळी स्पष्ट केले.
कोल मंत्रालयाच्या आढावा बैठकीमध्ये ओबीसी आयोगास प्राप्त झालेल्या अनेक तकारी संदर्भात सुनावणी घेत आयोगाने व्यक्तीगत प्रकरणे, ओबीसी वर्कर्स फेडरेशनच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतांनाच रोस्टरनुसार ओबीसी पदभरती, आरक्षणानुसार बॅकलाग भरणे तसेच ओबीसी वर्गाच्या कल्याण व जनसुविधाविषयक बाबींच्या पुर्ततेबाबतही अध्यक्षांनी निर्देश देत सविस्तर आढावा घेवून चर्चा केली.